शनी विचार

"प्रभाते मनी राम चिंतीत जावा' असं समर्थ म्हणतात. ती जी ही सकाळ आहे ना, ती आत्मजागृतीची सकाळ समजली पाहिजे! आणि जागं होण्यासाठी कोणतही कारण पुरतं! कुणाला असं वाटेल की, सद्गुरू येतील, मला उठवतील, मग मी जागा होईन. तर लक्षात ठेवा, जागं व्हायची तुमची वेळ आली ना की, तुम्ही कशानेही जागे होता आणि वेळ आली नाही आणि प्रत्यक्ष परमेश्वर जरी येऊन उभा राहिला, तरी तुम्ही नाही जागे होणार! ती वेळ म्हणजे तुमची इच्छा! तुमची अतूट, आत्यंतिक इच्छा! आणि ती इच्छा होण्यासाठी ही मानसिकता तुम्ही निर्माण केली पाहिजे. नामस्मरणानं, चिंतनानं, विचारानं हे घडतं, त्याशिवाय नाही. मनामध्ये सतत घोकत रहा की, मला जागं व्हयचंय, तेव्हा जागं करणारा तुम्हाला भेटेल.
पण जागं होण्याचा आपण विचारच नाही केला, तर जागं करणारा तरी आपल्याला कसा भेटेल? राजाभाऊ नावाचे एक गृहस्थ होते. सरकारी अधिकारी होते, कारकून म्हणून लागले. होता होता अधिकारी झाले. निवृत्त होतांना मोठ्या पदावरून निवृत्त झाले. वेळेवरती लग्न झाले. वेळेवर मुले झाली. मुलं, मुली मोठ्या झाल्या. त्यांची लग्नं वेळेवर झाली. नातवंड-पतवंड आली. या राजाभाऊंना एक सवय. संसार अगदी सुरळीत चाललेला. पण त्यांना रोजची सवय होती की रोज सकाळी साडेचारला मॉर्निंग वॉकला - प्रभातफेरीला - बाहेर पडायचे आणि तासभर फिरून साडेपाच वाजता परत यायचे. येवढ्या सकाळी रहदारी गडबड नसायची, काही त्रास नसायचा. अगदी शांत वातावरण! रोज फिरायला जायचं रोज! एक दिवस असेच सकाळच्या शांत वेळी फिरायला बाहेर पडले. एका इमारतीखालून चालले होते. त्यांच्या कानावर आवाज पडला. वरच्या मजल्यावरील कोणीतरी बाई कोणालातरी उठवीत होती. ती आपल्या मुलाला उठवित असेल, किंवा आपल्या धाकट्या भावाला, माहिती नाही. ती बाई म्हणत होती, "राजा, बेटा उठ! किती झोपलास? केव्हा जागा होणार? राजा, बेटा, आयुष्य फुकट जाईल. असाच झोपून राहिलास तर तुझं कसं होईल? यश मिळवायच असेल तर असं झोपून चालायचं नाही. असं झोपून झोपून आयुष्य संपून जाईल.' ती राजा, राजा म्हणत होती आणि या राजाबाबूंच्या मनात विचार आला, "खरंच! मी तरी जागा झालोय का? ती बाई कुणाला म्हणत होती ते त्यांना माहित नव्हतं, पण त्यांच्या मनात विचार आला, खरंच मी जागा झालोय? देवानं काय कमी केलय मला? सगळं दिलंय. पैसा दिला, घरदार दिलं, बायको दिली, मुलं दिली, नातवंड दिली. काय कमी केलंय मला? पण मी जागा झालोय? अजून मी त्यातच रमलोय. त्याच्या पलिकडे मी जातच नाही. आता मी रिटायर झालो. कामाचं, नोकरीचं बंधन राहिलं नाही मला. पण अजूनही मी जागा होत नाहीये. सांगता येत नाही केव्हां वेळ येईल, केव्हा बोलवणं येईल. आणि तोपर्यंत मी जागा व्हायचं थांबायचं? ती बाई मुलाला म्हणते की, कोणाला माहिती नाही. पण हा जागा झाला! राजाभाऊ घरी आले आणि म्हणाले, "चला, सामान बांधा माझं! तीर्थक्षेत्री जाऊन तप:श्चर्या करायची आहे मला! मला आत्मन्नोती साधायची आहे, आत्मोद्धार करून घ्यायचा आहे', सगळे म्हणतात, "काय झालं?' मी जाग झालो म्हणालो. आज मी जागा झालो. आपण जागं व्हायचं ठरवलं ना, तर जशीजशी इच्छा होईल, तशी जागं व्हायची वेळ नक्की येईल. पण तशी इच्छा करायलाच हवी. इच्छा न करता नाही होता येणार. आंबा पिकला ना की, तो झाडाहून खाली पडतोच!