कल्पवृक्षाकडे जाताना

मी स्वामीजींना विचारले की, तुम्ही आशीर्वाद देता. एखादी विशिष्ट गोष्ट किंवा कृती करावयास सांगता किंवा विशिष्ट शब्दात प्रार्थना करावयास सांगता आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात हे कसे होते?
ते म्हणाले, "हे सारे विश्व एका विशेष तत्वाने एकमेकांशी जोडलेले आहे. म्हणजे मी विश्वाशी व विश्व माझ्याशी जोडलेले आहे."

ही जोडणी व्यवहारातून निर्माण झालेली आहे का? शारीरिक आकर्षणातून निर्माण झालेली आहे का? असा विचार केला तर त्याचे उत्तर हे आहे की, हो जोडणी बाकी कशातूनही निर्माण झालेली नसून अंतर्मनाच्या विश्वात्मक मनाशी असणाऱ्या संबंधातून झालेली आहे. हे वैश्विक नात्याचे तत्व जर तुम्ही योग्य रित्या समजून घेतले व त्याचा योग्य पद्धतीने उपयोग केला तर तुम्हाला दु:ख, अडचणी, अपयश व कमतरता या गोष्टींचा त्रास होऊ शकत नाही. जगातील बहुसंख्य लोक हे सर्व प्रकारचे त्रास सहन करीत असतात, कारण ते त्यांचे बाह्यमन व बुद्धी याचाच फक्त वापर प्रत्येक ठिकाणी करतात त्यामुळेच ते अडचणीत येतात व दु:खी होतात. जर त्यांनी त्यांच्या अंतर्मनाच्या अमर्याद शक्तीचा योग्य वापर केला असता तर ते दु:खी झाले नसते!