यशस्वी प्रार्थनेची खूण

बिल किती आहे हे टॅक्सीच्या मीटरवरून कळते. ताप किती आहे हे थर्मामीटरवरून कळते. त्याप्रमाणे प्रार्थना योग्य पद्धतीने झाली आहे याची पोहोचपावती म्हणजे तुमच्या मनाची तत्काळ निर्माण होणारी ताणविरहीत, आत्मविश्वासपूर्ण, उत्साही अवस्था ही होय. ज्यादिवशी ज्याक्षणाला तुम्ही सगळे नियम पाळून नि:शंक मनाने सकारात्मक भावनेने ओतप्रोत होऊन प्रार्थना कराल त्याक्षणाला तुम्हाला वर सांगितलेली अवस्था तुम्ही अनुभवल्याशिवाय रहाणार नाही.

शक्यता आहे की पहिल्याच प्रार्थनेपासून तुम्ही हा अनुभव घ्याल व तो पुढे ही कायम टिकेल परंतु प्रत्येकाच्या बाबतीत असेच घडेल असे समजणे चुकीचे होईल. शक्यता ही पण आहे की पहिल्या प्रार्थनेत तुम्हाला थोडा अनुभव येईल. दुसऱ्या वेळी थोडा जास्त अनुभव येईल व हळूहळू पण निश्चित तुम्ही प्रार्थना करण्यात प्राविण्य मिळवाल.

दुसरी खूण म्हणजे तुम्ही जी प्रार्थना करीत आहेत त्याच्या प्राप्तीसाठी तुमच्यात व तुमच्या अवतीभवतीच्या लोकांच्या मनात होत जाणारा सकारात्मक बदल. तुम्हाला जे ध्येय गाठावयाचे आहे त्यासाठी लागणाऱ्या संपर्काची होत जाणारी उपलब्धता !!! सुरुवातीला हे पुसट जाणवत राहील व हळूहळू ते निश्चित स्वरूप धारण करेल व तुमच्या लक्षात येईल की तुमचा ध्येयाच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे.