परमेश्वर पालक आहे

आपले आईवडील किंवा जे पालक असतील त्यांच्याकडे आपण आपल्या आवश्यकता प्रगट करतो व त्यातून ज्या योग्य त्या ते पुऱ्या करतात व अयोग्य, अनावश्यक, अवेळी प्रकट केलेल्या गरजा ते नाकारतात किंवा टाळतात कारण ते मुलांचे हितचिंतक असतात. परमेश्वर आपला आई, वडील, पालक सर्वकाही आहे आणि म्हणूनच आम्ही मागितलेल्या पैकी जे आमच्या हिताचे आहे ते तो आम्हाला देईल व जेव्हां जितके योग्य आहे तेव्हां तितकेच देईल. तुम्हाला जे हवे ते, जितके, जसे व जेव्हा हवे तसेच परमेश्वर देणार असेल तरच प्रार्थना करीन असे कोणाचे मत असेल तर त्याने प्रार्थना करूच नये ! कारण याला प्रार्थना म्हणता येणार नाही तर हा विनंतीपूर्वक केलेला आदेशच म्हणावा लागेल. आणि परमेश्वराला आदेश करण्याइतका जगात कोणीच मोठा नाही याची सदैव जाणीव ठेवा. राष्ट्नध्यक्षाला भेटणे हे मोठमोठ्या लोकांनाही सहज साध्य होत नाही परंतु त्या राष्ट्नध्यक्षाचा मुलगा त्याला सहज भेटू शकतो कारण त्यांचे नाते भावनिक आहे व बाकीच्यांचे राजशिष्टाचाराला धरून आहे. परमेश्वराला पिता समजून पुत्राच्या नात्याने काहीही मागण्याचा तुम्हाला जसा भावनिक अधिकार आहे, तसाच त्याची योग्यायोग्यता पाहून जे तुमच्या हिताचे आहे तेच तुम्हाला देणे व योग्य वेळी देणे हे ठरविण्याचा अधिकार परमेश्वराला आहे हे लक्षात ठेवा.